सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या स्मृतींचे स्मरण देणाऱ्या 'रसिकराज' पुरस्काराने मला माझ्या गायन कलेतील जबाबदारींची जाणीव करून दिली आहे. तसेच या पुरस्काराने माहेरचा आनंद दिला आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गायन समाज देवल क्लब व मुजुमदार परिवार यांच्या वतीने दिला जाणारा 'रसिकराज' पुरस्कार श्रुती सडोलीकर-काटकर यांना रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांच्या हस्ते आज येथे प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.

श्रुती सडोलीकर-काटकर म्हणाल्या, या पुरस्काराने मला प्रोत्साहन मिळाले आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे आपण कलेच्या प्रवासात कुठे पोहोचलो आहोत, याची जाणीव होते. तसेच भविष्यात आणखी कुठपर्यंत पोहोचायचे आहे, यासाठी मार्गक्रमण करण्याची ऊर्जा मिळते. त्याची प्रचिती 'रसिकराज' पुरस्कारामुळे आली.

जगभरात माझ्या गायनाचे कार्यक्रम झाले असले तरी, मी ज्या मातीत जन्मले आणि जिथे मला संस्कार मिळाले, त्या मातीचे आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना जागृत ठेवण्याचा सल्ला मला वडिलांनी दिला होता. त्या मातीचे ऋण फेडण्याची जाणीवही या पुरस्काराने करून दिली आहे.

उषा थोरात म्हणाल्या, आबासाहेब मुजुमदार यांच्या संगीतविषयक साहित्य व साधनांची जपणूक त्यांच्या पुढील पिढीने केली आहे. त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. कोल्हापूरला कला आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा लाभली आहे. तिची जपणूक गायन समाज देवल क्लबसारख्या संस्था करत आहेत. त्यामुळे कोल्हापूर हे कलाक्षेत्राचे एक महत्त्वाचे 'हेरिटेज' ठरते.

अशा परंपरेतून आलेल्या सडोलीकर यांना संगीत क्षेत्रातील दिग्गज गुरू लाभले. त्यांच्या गायनात तरलता आहे. गुरूंचे आशीर्वाद आणि साधना यांचा संगम त्यांच्या उत्कृष्ट गायकीतून दिसून येतो.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीकांत डिग्रजकर यांनी प्रास्ताविक केले. पं. विनोद डिग्रजकर तसेच मुजुमदार परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते. गायन समाज देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला.

पाय जमिनीवर ठेवण्याची जाणीव

कोल्हापूर हे माझे माहेर आहे. येथेच मी गायन शिकले आणि इथल्या मातीने मला संस्कार दिले. या पुरस्काराने मला पाय जमिनीवर ठेवण्याची जाणीव दिली आहे. भविष्यात कोल्हापूरमधील मुलांसाठी संगीतविषयक उपक्रमांत मार्गदर्शन करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन, असे श्रुती सडोलीकर-काटकर यांनी सांगितले.